चांदापुरी | प्रतिनिधी
सन 1925 मध्ये स्थापन झालेली आणि शंभर वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेली जि. प. प्राथमिक केंद्र शाळा, चांदापुरी येथे गेल्या चार वर्षांपासून केंद्रप्रमुखाचे पद प्रभारी व्यवस्थेवर चालत होते. चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेत केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, मा. शाहिदभाई शेख, भाजप अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष यांनी सातत्याने शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून श्री. संभाजी औटी यांची केंद्रप्रमुख म्हणून, तर श्री. शिवाजी चौगुले यांची प्रभारी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे शाळेचे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी होणार असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालकांनाही मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नवीन नियुक्त झालेल्या केंद्रप्रमुख व प्रभारी शिक्षकांचे ग्रामस्थ, पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिक्षक नियुक्त करण्यासाठी मा. आ. रामभाऊ सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली शाहिदभाई शेख यांनी विशेष पाठपुरावा केला.
यावेळी चांदापुरी गावचे लोकनियुक्त सरपंच जयवंत अण्णा सूळ,माजी उपसरपंच तात्यासो चोरमले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिताराम सरक,उपाध्यक्ष नामदेव बोडरे,भाजपा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शाहिद भाई शेख, आरपीआय अध्यक्ष प्रवीण देठे, चंदनशिवे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.

