चांदापुरी :
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत पूर्ण झाली असून, या ठिकाणी अद्याप वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी इतर गावांमध्ये जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे माळशिरस मंडळ अध्यक्ष मा. शाहीदभाई गुलाब शेख यांनी जिल्हा परिषद, सोलापूरचे आरोग्य सभापती मा. चेतनसिंह केदार सावंत यांना निवेदन देऊन चांदापुरी आरोग्य उपकेंद्रात तातडीने कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, चांदापुरी गावाची लोकसंख्या अंदाजे ३ हजार असून, गावासाठी नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र, या इमारतीत अद्याप वैद्यकीय अधिकारी, एएनएम (ANM) आणि आरोग्य सेवक यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
त्यामुळे गावातील नागरिकांना, विशेषतः माता-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना, किरकोळ आजारांवरील उपचारांसाठीही पिलीव, अकलूज किंवा माळशिरस येथे जावे लागत आहे. परिणामी नागरिकांना वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागत असून, गावातच प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याची गरज निर्माण झाली आहे.
चांदापुरी येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत तयार असतानाही कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना अपेक्षित आरोग्यसेवा मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि उपकेंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शाहीदभाई शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आता प्रशासन काय भूमिका घेणार?
चांदापुरीतील नवीन आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती होऊन हे केंद्र प्रत्यक्ष सुरू होणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन गावातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
