जनतेचा आसूड | पिलीव | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने पिलीव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील 25 एकर पठारावर साकारत असलेल्या “खास पठार” प्रकल्पाच्या विकासकामास गुरुवार (दि. 2 जुलै 2026) रोजी शुभारंभ करण्यात आला.
या प्रकल्पातील विशेष आकर्षण असलेल्या “फ्रूट फॉरेस्ट” विभागात देशी व विदेशी फळझाडांच्या लागवडीची सुरुवात संचालक मा. वजीर शेख साहेब यांचे बालपणीचे मित्र तथा निवृत्त मुख्याध्यापक श्री.महादेव सरवदे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
‘खास पठार’ प्रकल्पात देशी व विदेशी फळझाडांसह सावली देणारी, शोभेची, औषधी, दुर्मिळ, लोप पावत चाललेली तसेच ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली वृक्षप्रजाती मोठ्या प्रमाणात लावण्यात येणार आहेत. त्यामुळे हा परिसर भविष्यात जैवविविधतेचे समृद्ध केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याशिवाय प्रकल्पाच्या आरोग्य विभागात नागरिकांसाठी व्यायाम, योग, मनोरंजन, विश्रांती तसेच विविध मैदानी खेळांसाठी आधुनिक सुविधा आणि स्वतंत्र मैदान उभारण्यात येणार आहे. पर्यावरण आणि आरोग्याचा समतोल साधणारा हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
यावेळी प्रकल्पाचे संचालक वजीर शेख यांनी सांगितले की, “‘खास पठार’ हा केवळ वृक्षलागवडीचा प्रकल्प नसून निसर्ग, आरोग्य, पर्यटन आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम आहे. भावी पिढ्यांना समृद्ध पर्यावरणाचा वारसा देण्यासाठी हा उपक्रम उभारला जात आहे.”
पर्यावरणपूरक आणि लोकहिताचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भविष्यात पिलीव परिसराची नवी ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मराठी व हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेता वजीर शेख यांचे घनिष्ठ मित्र श्री सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेचा सहभाग खास पठार या प्रकल्पामध्ये असणार आहे. लवकरच श्री सयाजी शिंदे नियोजित खास पठारला भेट देणार असून त्यांच्या हस्ते देशी वृक्षांची लागवड करून खास पठार व सह्याद्री देवराई यांचा एकत्रित उपक्रम राबवला जाणार आहे.
या कामी वजीर शेख यांची पत्नी इशा शेख, बंधू शब्बीर शेख, कामगार श्री गहिनीनाथ तुपे,
श्री केशव काळे ,श्री म्हाकू जयराम सूळ सर्व रा. चांदापुरी
हे खास पठार साकारत आहेत .
