माळशिरस | प्रतिनिधी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस मारहाणीच्या निषेधार्थ माळशिरस बार असोसिएशनच्या वतीने गुरुवार (दि. 23 जुलै 2026) रोजी तहसीलदार, माळशिरस यांना निवेदन देण्यात आले.बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. विलास तात्याबा पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी तहसील कार्यालयात जाऊन हे निवेदन सादर केले. 
निवेदनात 20 जुलै 2026 रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली कथित पोलिस कारवाई ही बेकायदेशीर व मानवतेला काळिमा फासणारी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.तसेच, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दिल्लीचे पोलिस आयुक्त यांना तात्काळ निलंबित करावे आणि या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.माळशिरस बार असोसिएशनने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी आक्रमकपणे सहभागी झाले होते.

तहसील कार्यालयाने हे निवेदन स्वीकारले असून पुढील कार्यवाहीसाठी ते शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
